children's stories


स्टोन पेपड सिजड....आणि छातीत धस्स!!!
एक वर्षभारापुर्वीची गोष्ट.

निरूचा वाढदिवस मल्हारच्या वाढदिवसानंतर तीन महिन्यांनी असतो. मल्हारचा चौथा वाढदिवस झाला होता. निरूचा वाढदिवस म्हणून तिला ‘ट्रेंड्स’ (कपड्यचा मॉल) मधे कपडे आणायला गेलो होतो. निरु,  रेखा, युवराज, मल्ह्रार आणि मी. मॉल मधे घुसल्याबरोबर पोरं धावत धावत पहिल्या मजल्यावर थेट ड्रेसिंग रुमच्या दिशेने अन त्यांच्यामागे मी. समोरून एक सडपातळ college girl तिच्या मैत्रिणीकडून  ओपिनियन घेत  होती. ही पोरं त्या पोरीला वळसा घालून माघ वळली. मॉलमधे  शिरल्यापासून पोरांनी नुस्ता धिंगाणा करायला सुरुवात केली होती. त्या पोरींनी आकर्षक fancy कपडे, हाय हीलचे सॅंडल्स घातली होती. टक टक आवाज करत तिथल्या तिथं कॅटवॉक करत होत्या. हातात मोबाईल. त्यातील एक सेल्फी स्पेशालीस्ट होती अन pout स्पेशालीस्टसुद्धा. मी तिच्याकडे पाहत होतो. रेखा हळूच, “अहो.....” माझं रेखाकडे  लक्ष गेले नाही. थोडासा आवाज चढवून पण दबक्या आवाजात, “अहो...कपडे बघा निरुसाठी.” मी ‘हो’ म्हणालो आणि त्या दोघी त्यांच्या स्वर्गात गेल्या  आणि मी माझ्या ‘दुनियेत’ परत आलो.

तेवढा वेळ पोरांना खेळ सुरु करायला पुरेसा होता. तिघांनी हात फडकायला सुरु केलं. मल्ह्रार, “स्टोन-पेपड-सिजड... स्टोन-पेपड-सिजड दादा तू उतडला. पडत; स्टोन-पेपड-सिजड...स्टोन-पेपड-सिजड... स्टोन-पेपड-सिजड निरु तू उतडली, आता माझ्यावर डाज्य. हं पकडापकडी...” आता निरुला कपडे ट्राय करण्यात आजिबात इंटरेस्ट राहिला नव्हता. कपड्याच्या मांडण्याच्या मधे, मांडण्याच्या  खाली, मांडण्याच्या मागे, पकडापकडी चालू होती. मिळेल त्या जागेतून पळापळी चालू होती. एक दोन वेळेस मांडण्या पडता-पडता वाचल्या.  मॉलमधील स्टाफ वैतागला होता. रेखाचं धमकी सत्र मधे मधे चालूच होतं. पण कस्टमरला नाराज करता येत नाही म्हणून स्टाफच्या चेहऱ्यावरचं deplomatic हसू जपत, “मॅडम, मुलं आहेत ती...चालायचंच.” असं चालू होतं.

त्याचं धिंगाण्याचं बळ कमी करण्यासाठी युवराजचा बळी घेलता. युवराजला धमकी दिली. “जास्त त्रास दिला तर कराटे क्लास बंद,” रेखाने चढ्या आवाजात दम दिला. युवराज बिच्चारा एका दमात शांत. युवराजचा आध्याय इथंच समाप्त.

रेखाचं ते उग्र रूप पाहून दोघेही सगळे शांत. रेखा कपडे पाहायला निघून गेली. तिला वाटलं आता परिस्थिती कंट्रोलमध्ये आली, पोरं शांत झाली. पोरं शांत झाली कारण त्यांनी खेळ बदलला होता. शांततेत खेळायचा खेळ निवडला होता-लापाछापी!!!  दोघांनीच लापाछापी खेळायचं ठरवलं. दोघांनीच दबक्या आवाजात स्टोन-पेपड-सिजड केलं, उतरला मल्हार पण राज्य मात्र आलं होतं रेखावर. सिलेक्ट केलेला ड्रेस घेऊन रेखा निरुला शोधात होती. इतर ग्राहक त्याचं चौकटीतलं काम करत होती. सेल्फी एक्स्पर्ट नवीन ड्रेस ट्राय करून दोन बाय तीन फुटाच्या जागेत कॅटवॉक करणे चालू होते. निरुने युवराजला खुणेने हात हलवत विचारले , मल्हार कुठेय? त्याने मानेने खुणावले ड्रेसिंग रूमकडे. निरु ड्रेसिंग रूमकडे निघाली. निरूच्यापुढे सेल्फी एक्स्पर्ट अन मागे रेखा. सेल्फी एक्स्पर्टने जसा चेन्गिंग रूमचं दार उघडलं तसं मल्ह्रारने “धप्पा !!!’ घातला. तशी सेल्फी एक्स्पर्ट जोरात ओरडून मागे पळाली. त्यावर रेखा जोरात ओरडली - “मल्हा.......र.”  सेल्फी एक्स्पर्टने जोरात कान दाबले. पहिला मजला pindrop silence. त्या सेल्फी एक्स्पर्टला हे सगळं अनपेक्षित होतं. ती एका बाजूला उभी राहिली. आईचा मार मिळेल म्हणून मल्हार कचरत्या पावलांनी माझ्या मागे येऊन लपला. एका डोळ्याने रेखाकडे पाहू लागला. रेखानं हातातील ड्रेस आहे असा निरुच्याच्या अंगाला लावला. लावला तसा सिलेक्ट झाला. रेखानं चान्स घेतला नाही. रेखा, “चला खाली. तुम्ही तरी लक्ष द्यायचं ना.” मी होकारार्थी मान डोलावली आणि खाली गेलो.

सगळे शांततेत खाली आले. बिलासाठी हीsss गर्दी. थोडा वेळ शांततेत गेला. युवराज, निरु एकदम शांत. रेखाला सेल्समन ऑफर्सच्या  स्कीम्स  सांगू लागला तसा मल्हार अन निरु पुन्हा सुरु झाले. त्यांची गडबड पाहून काऊनटर वरील माणसाने आमचं बिल अगोदर घेतलं. रेखा चिडून म्हणाली, “कुठंच न्यायच्या लायकीचे नाही. चला, आता बसा गाडीत.”

गाडी सुरु झाली. रेखाचा अवतार पाहून युवराज शांतच होता. गाडी थोडी पुढे गेली तसं त्या दोघांची गडबड सुरु झाली. रेखा ओरडली, “द्या या दोघांना खाली सोडून इथंच.” मी, “जे जास्त गडबड करीन त्याला मी इथंच या रस्त्यावर सोडून निघून जाईल. समजलं का?” युवराज हळूच म्हणाला, “दोघंही सारखीच गडबड करतात.” मी जोरात ओरडलो, “ तू शांत बस अगोदर नाहीतर तुलाच खाली उतरून देईल.” गाडीत स्मशान शांतता. गाडी बराच वेळ चालली, एकदम शांततेत. धाडस करत मल्हार म्हणाला, “निडु, स्टोन-पेपड-सिजड” निरुने आमचा अंदाज घेत भीतभीत त्याच्याबरोबर हात फडकवायला लागली. ‘स्टोन-पेपड-सिजड, स्टोन-पेपड-सिजड स्टोन-पेपड-सिजड’ आणि निरु हारली. लगेच मल्हार म्हणाला, “बाबा, ही हाडली हिला उतडून द्या इथंच डस्त्यावर. आमी दोघांनी साडखीच गडबड केली होती.” निरूच्या छातीत धस्स!!! तिला काय करावं कळेना. तिनं रडनं दाबून धरलं होतं. अन तो कृतीच्या आशेन माझ्याकडे बघत होता.


Comments